BY,दि.14-POL,कुणाल शेलार,मुरबाड -
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर” आज मुरबाड तालुक्यातील धसई येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबीराला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शेकडो नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.या शिबिराला आमदार श्री.कथोरे यांनी समस्त नागरिक,ग्रामस्थांशी संवाद साधला.
त्यांनी बोलतांना सांगितले की,या शिबीराच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रयत्न असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे.
या शिबीरामध्ये उत्पन्न दाखला,रहिवासी दाखला,जात प्रमाणपत्र,नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र,विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध दाखले तसेच ७/१२ उताऱ्यातील त्रुटी दुरुस्ती अशा विविध महसूल सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे.त्यामुळे नागरिकांना शासनाच्या कार्यालयांमध्ये वारंवार फेरफटका मारण्याची गरज न पडता त्यांचे काम तात्काळ मार्गी लागत आहे.या शिबीरांचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी आमदार किसन कथोरे यांनी तमाम जनतेला केले आहे.
यावेळी व्यासपीठावर आमदार किसन कथोरे, मुरबाड तहसिलदार अभिजित देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे,भाजपाचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिपक पवार,जितेंद्र भावार्थे,मुरबाड पंचायत समितीचे मा. उपसभापती सौ.सिमा अनिल घरत,अन्य मान्यवर यांच्यासह संबंधित मंडळाधिकारी,तलाठी, कर्मचारी,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. हे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.





Post a Comment